

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून गुरुवारी (दि. 5) रात्री बारावाजेपर्यंत प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या लवकरच जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत.
जिल्ह्यात नऊ हजार 250 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातील नऊ हजार 61 शिक्षक सध्या कार्यरत आहेत. त्यातील जवळपास साडेचार हजार शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची बदली शासनाच्या आदेशानुसार होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.दरम्यान, दहा दिवसांत नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रखडणार असल्याचा अंदाज काही शिक्षक संघटनेतून व्यक्त होत आहे. मात्र, त्याआधीच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर बदल्या होणार का हे येत्या काही दिवसात कळणार आहे.