

सोलापूर : राज्यात पवित्र पाेर्टलद्वारे शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. तसेच उर्वरित पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यातील काही पदे भरल्यानंतर शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्या मुलाखती व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात याव्यात, यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. तसे आदेश निघाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो डी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवार भरती प्रक्रियेची वाट पाहात आहेत. त्यातच काही शिक्षक संघटनांनी शिक्षक भरतीनंतर होणाऱ्या मुलाखतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीचा विचार शासन करत असून, लवरकच तसा आदेश निघण्याची शक्यता आहे.
राज्यातील विविध शाळांमध्ये १० हजार ३४७ शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. त्यातील काही शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे ही भरती अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शासनस्तरावर एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
वशिलेबाजीला बसणार आळा
पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या या शिक्षक भरतीमध्ये प्राथमिक पात्रतेनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. या मुलाखतीदरम्यान कोणताही गैरप्रकार, वशिलेबाजी किंवा अनियमितता होऊ नये, यासाठी शासनाकडून सर्व मुलाखतींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याच्या वेगाने हालचाली सुरू आहेत. तसा आदेश जारी केल्यास वशिलेबाजीला आळा बसणार आहे.