

बार्शी : एखाद्या भागाला, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला नव्हे तर राज्यालाही स्वतःची काहीतरी वेगळी ओळख असते. असेच वेगळपण बार्शी तालुक्यातील आगळगावने जपले आहे. शिक्षकांचे गाव म्हणून राज्यात नावलौकिकास पात्र ठरले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यतील शेकडो वाड्या-वस्त्यांवर, जिल्ह्यात, तालुक्यात या गावचा एक तरी शिक्षक ज्ञानदानासारखे काम करीत असल्याचे दिसून येते.
आगळगावची लोकसंख्यासाधारणपणे सहा ते सात हजार आहे. या हजार ते बाराशे उंबरा असलेल्या बहुतेक घरात घरटी किमान दोन शिक्षक असून जास्तीत जास्त आठ, दहा किंवा वीस शिक्षक असलेली कुटुंबे आगळगाव येथे आहेत. गावात साधारणत दीड हजाराच्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. नुकत्याच पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या परीक्षेतही गावातील नवीन शिक्षक सेवेत रुजू झाले आहेत.
शिक्षकांचे गाव आगळगाव ही पूर्वीपासूनची ओळख असताना सध्या पवित्र पोर्टलमधून जेव्हा महाराष्ट्र शासनामार्फत शिक्षकांची भरती केली जाते यामध्येही गावातील डी.एड. व बी.एड. पदवीधारक विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद व विविध संस्थेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नेमणूक होत आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानात गावातील शाळेने सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सोलापूर, धाराशिव, पुणे, नगर, नाशिक यासह महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात आगळगावातील शिक्षक नोकरीच्या निमित्ताने सेवा देत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्य वाटणाऱ्या या गावात दीडशे वर्षांपासून शिक्षणाची परंपरा आहे. १९९३ पासून बारावीनंतर डी.एड. झालं की नोकरी लागायची, काही दिवस मिळेल तिथे नोकरी केली की बदलीने गावापासून जवळच नोकरी मिळायची, त्यातच लग्न करून पत्नीही शिक्षिका मिळाली की दोघांची नोकरी किंवा नोकरी करत आपली शेती असे नोकरी व शेती याचं बरोबर गणित जुळल्याने गावातील तरुणांमध्ये डी.एड. पूर्ण करून नोकरी करायची अशी एक स्पर्धा लागायची. त्याचा सकारात्मक परिणाम गावात शिक्षकांची संख्या हळूहळू वाढत गेली.