

माढा : माढा तालुक्यातील तडवळे ते वडशिंगे रस्त्याचे काम मंजूर होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला, तरी कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. या कामाच्या सद्यस्थितीबाबत खोटा अहवाल देऊन सध्या हे काम अंदाजपत्रकाप्रमाणे केले जात नाही. सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे आ. सरोज अहिरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
सदरचे काम शासनाने मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग, सोलापूर यांच्याकडून दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी मे. देशमुख ॲण्ड कंपनी यांना निविदा व कार्यारंभ आदेश देण्यात आला. निविदा अटीनुसार ठेकेदाराने 22 मे 2025 पर्यंत विहित कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु तसे न करता ठेकेदाराने दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही काम पूर्ण न करता नियमबाह्य मुदतवाढ घेतली आहे.
हे काम त्रयस्थ ठेकेदाराकडून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काम सबलेट न करता परस्पर त्रयस्थ ठेकेदाराकडून काम सुरू केले आहे. सदर काम मूळ अंदाजपत्रकानुसार न करता मुख्य रस्त्यावरील फक्त मुरूम खोदून त्याच मुरुमाचे सपाटीकरण करत आहेत. या कामाची पाहणी पडताळणी व गुणवत्ता तपासणीची जबाबदारी ही उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांची असताना, ते अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याची नोंद घेत नसल्याचे दिसते. या प्रकरणी खोटी बिले दाखल करून शासननिधीची फसवणूक होण्याचा संशय आहे. गुणवत्ता व दक्षता नियंत्रक मंडळ, पुणे यांच्याकडून सदर कामाची तात्काळ तपासणी करून याबाबत हलगर्जी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.