सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर अंगणवाडी कर्मचार्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी एक कोटी 44 लाख 52 हजारांचा निधी वर्ग केला. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची दिवाळी गोड होणार आहे.
जिल्ह्यातील सात हजार 226 अंगणवाडी कर्मचार्यांना राज्य शासनाच्यावतीने दीपावलीसाठी प्रत्येक कर्मचारी यांना दोन हजार रुपयांप्रमाणे भाऊबीज देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचार्यांच्या खात्यावर भाऊबीजेची रक्कम वर्ग करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.जिल्ह्यात तीन हजार 901 अंगणवाडी सेविका, तीन हजार 325 अंगणवाडी मदतनीस, असे एकूण सात हजार 226 अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. त्या प्रत्येक अंगणवाडी कर्मचार्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे भाऊबीज देण्यात येणार आहे.
सोमवारपासून दिवाळीला सुरू होत आहे. त्यापूर्वीच भाऊबीजेची रक्कम जमा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने तालुका स्तरावर निधी वर्ग केला. येत्या तीन ते चार दिवसांत भाऊबीजेची रक्कम अंगणवाडी कर्मचार्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.