Bhima sugar factory: सुस्ते येथे दोन गटांमध्ये ‌‘फ्री स्टाईल‌’

खा. धनंजय महाडिक आणि माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक भीमा साखर कारखान्यावरील आरोप-प्रत्यारोपावरून भिडले
Sugar Factory
Sugar Factoryfile photo
Published on
Updated on

पंढरपूर / मोहोळ : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे शुक्रवारी (दि.22) रोजी खा. महाडिक आणि माजी आमदार प्रशांत परिचारक या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकरणाचा संबंध खासदार धनंजय महाडिक यांच्या संदर्भात सोशल मीडियावरील कमेंटस्‌‍ आणि भीमा साखर कारखान्यावरील आरोप-प्रत्यारोपाशी जोडला जात असल्याचे वृत्त आहे. यात काही जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत रात्री उशीरापर्यंत पंढरपूर किंवा मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले नाहीत. गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक गटाकडून समाज माध्यमांवर सुरू असलेल्या कमेंटस्‌‍, टीका-टिप्पणी आणि एकमेकांना दाखवल्या जाणाऱ्या टशनमधून हा वाद पेटला. या वादाचे रूपांतर शेवटी हाणामारीत झाले. या हाणामारीत डोळ्यात मारण्याचा स्प्रे, फायटर आणि घातक हत्यारांचा वापर केल्याचे समजते. या हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

खासदार महाडिक यांचे समर्थक जखमी

या हाणामारीत खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तात्यामामा नागटिळक यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यात तात्यामामा नागटिळक यांचा सख्खा भाऊ धनाजी नागटिळक, मुलगा आकाश, जावई युवराज चव्हाण, तसेच त्यांचे समर्थक रामदास चव्हाण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

जखमींना सोलापूर रुग्णालयात हलवले

सर्व जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, आकाश नागटिळक यांच्या डोळ्यालगत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर सुस्ते गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. दोन गटांतील वाद आणखी वाढू नये यासाठी पंढरपूर पोलिसांनी सुस्ते परिसरात धाव घेतली आहे. पोलिसांकडून सध्या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news