

सोलापूर : प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेंंतर्गत एक लाख 35 हजार 896 घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यातील सेल्फ सर्वेक्षण केलेल्या लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणाची तपासणी होणार आहे. तसेच गरजू लाभार्थ्यांना घरकुले मंजूर होणार आहेत.
घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 मे ची तारीख दिली होती. त्या कालावधीत एक लाख 13 हजार घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतरही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत असल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती. त्यामुळे शासनाने 18 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. या काळात आणखी 22 हजार लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 47 हजार 790 जणांनी स्वतः अर्ज भरला आहे. तर 88 हजार 106 अर्ज ग्रामसेवकांनी सर्वेक्षण करून भरले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी भरलेल्या 47 हजार 790 अर्जांची तपासणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून होणार आहे.