

मोहोळ : देव, धर्म आणि त्यावरील श्रद्धा ही बाब वैयक्तिक न राहता ती रस्त्यावर आणून सर्वसामान्यांचे शोषण करते, तेव्हा ती अंधश्रद्धा बनते, असे विचार तंत्रज्ञ, समाजसेवक, वैज्ञानिक, लेखक व अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
मोहोळ येथे शनिवारी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मोहोळ शाखेच्या हितचिंतक, देणगीदार, जाहिरातदार व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार फाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते दादा चांदणे, राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद, राज्य कार्यवाह अॅड. गोविंद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे, डॉ. प्रमोद पाटील, मोहोळ शाखाध्यक्ष श्रीधर उन्हाळे, मनोज मोरे, अॅड. श्रीरंग लाळे, अॅड. विनोद कांबळे, डॉ. मिलिंद लामगुंडे, डॉ. शेंडे, बालाजी शेळके, अरुण भोसले, मनोहर गोडसे, प्रा. संभाजी चव्हाण, आकाश फाटे, सचिन फाटे, ओम कळसे, विजय चांदणे, बिरमल खांडेकर, संगीता फाटे, डॉ. स्मिता पाटील, मंजुषा कादे, अनुराधा चवरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. गोडबोले म्हणाले की, इस्त्रोमध्ये जेव्हा परदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेल्या राफेलची पूजा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केली जाते आणि त्याला लिंबू मिरची बांधत असतील तर हे भयानक आणि हास्यास्पद आहे. देशात दखल घ्यावी इतपत 7 लाख देवळे आहेत. बाकी किरकोळ किती असतील त्याचे मोजमाप नाही, 80 टक्के लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे आणि आपण महासत्ता होण्याची स्वप्नं पाहात आहोत. संविधानाने प्रत्येकाला देव आणि धर्माबाबत स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे देव मानणे, त्याची पूजा करणे, श्रद्धा बाळगणे ही ज्याची-त्याची वैयक्तिक बाब आहे. मात्र ही वैयक्तिक बाब जेव्हा रस्त्यावर येऊन सर्वसामान्यांचे शोषण करते, तेव्हा ती श्रद्धा राहात नसून अंधश्रद्धा होते.
यावेळी दादा चांदणे, अध्यक्ष नंदकुमार फाटे, अॅड. गोविंद पाटील, सुधाकर काशीद, धर्मराज चवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. वक्त्यांचा परिचय नवनाथ साळी यांनी तर सूत्रसंचालन व आभार अश्विन दळवी यांनी केले.