

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्याची आग्रही मागणी आहे. या प्रस्तावासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकार्यांना दिले.
ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रायालयात झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीत आ. विजयकुमार देशमुख यांनी स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी अनेक मुद्दे उपस्थित केले. बसवेश्वर स्मारक समितीच्या जागेसंबंधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, प्रशासनाने सदर जागेसाठी केवळ 19 गुंठे जागा उपलब्ध आहे असे उत्तर दिले, मात्र हे उत्तर समाधानकारक नाही. कृषी विभागाच्या जागेच्या ऐवजी कृष्णा तलावाच्या सभोवतालची जागा विचाराधीन घ्यावी, व ती जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली.
तसेच कृष्णा तलावाची जागा आरक्षित करून, त्यावर स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा, हा प्रस्ताव येत्या 15 दिवसांत शासनाकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात यावेत, संत चोखामेळा स्मारकासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून तो शासनास सादर करण्यात यावा अशी मागणी आ.विजयकुमार देशमुख यांनी बैठकीत मांडली.