सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पॅटचे पेपर सुरू झाले आहेत. शासनाकडून बंधनकारक असलेल्या पॅट पेपरसह मुख्याध्यापक संघाकडून घेतल्या जात असलेल्या पेपरमुळे एकाच दिवशी विद्यार्थ्यांवर दोन पेपरचा भार पडला आहे.
त्यामुळे यास शिक्षक संघटना, पालकांकडून विरोध होत आहे. शासनाकडून दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचा किती अभ्यास येतो, यासाठी मराठी, इंग्रजी आणि गणित पेपर सुरू केला आहे.
या पेपरबरोबर आता मुख्याध्यापक संघ त्यांचा पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपरला समोरे जावे लागत आहे. दरम्यान, पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
त्याची परीक्षा घेणे हे सर्व शाळांसाठी अत्यावश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांत पॅट पेपरसह स्थानिक पातळीवरील मुख्याध्यापक संघाकडून आलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. त्यामुळे एकाच दिवशी दोन पेपर घेऊ नका, अशी मागणी पालकांतून होत आहे. मात्र, याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये दिसत आहे.
66 शासनाच्या आदेशानुसार पॅट परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी त्या परीक्षेबरोबरच मुख्याध्यापक संघाने दिलेल्या प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात येत आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पॅट परीक्षेसह मुख्याध्यापक संघाने दिलेला पेपर घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन पेपर देण्याची वेळ आली आहे. याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे पॅट वितरिक्त इतर पेपर घेऊ नये, असे निवेदन देणार आहे.
सुजितकुमार काटमोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना