Students fee dispute: फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेने दाखवला घरचा रस्ता

करमाळा तालुक्यातील सेल्फ फायनान्स शाळेतील प्रकार
Students fee dispute: फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेने दाखवला घरचा रस्ता
Pudhari Photo
Published on
Updated on
अमोल साळुंके

सोलापूर : करमाळा तालुक्यातील एका नामांकित सेल्फ फायनान्स शाळेतील तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्याने वेळेत शैक्षणिक फी जमा केली नाही म्हणून शिक्षकाने या विद्यार्थ्यास वर्गातून बाहेर काढून घरचा रस्ता दाखवला. आर्थिक परिस्थिती नसलेला, हतबल विद्यार्थी अपमानित होऊन मुकाट्याने मूग गिळून गप्प राहिला. दरम्यान, विद्यार्थ्यास शिक्षणापासून पोरके करणाऱ्या, त्याच्या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या, फी वसुलीच्या नावाखाली पालकांना आर्थिकदृष्ट्या नागावणाऱ्या या शाळेच्या कृत्याविषयी सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच संबंधित शिक्षण संस्थाचालक, शिक्षकावर कठोर कारवाई करावी, संबंधित विद्यार्थ्याला शिक्षणाचा मूलभूत अधिकार सन्मानाने परत मिळावा यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेची स्वतः पाहाणी करावी, अशी मागणी होत आहे. शाळेने कायद्याचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांला थेट घरचा रस्ता दाखविला आहे. कायदा धाब्यावर बसवणाऱ्या, बेलगाम, उद्दामपणे वर्तन करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या अशा संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शाळांची मनमानी केव्हा थांबणार पालकांकडून मोठ्या रकमा उकळून सेल्फ फायनान्स शाळेकडून मनमानी कारभार सुरू आहे. प्रवेश फी भरण्यासाठी थोडा विलंब जरी झाला तर त्या विद्यार्थ्यांना अपमानित केले जात आहे. त्यामुळे अशा शाळांची मनमानी केव्हा थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शाळा बनल्या पैसे कमविण्याचे साधन

जिल्ह्यातील अनेक सेल्फ फायनान्स शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण व्यवस्थेऐवजी फी वसुलीचा धंदा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण ही सेवा न राहता काही शाळा व्यवस्थापनांसाठी केवळ पैसा कमावण्याचे साधन बनविल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसत आहे.

कायदा काय सांगतो...?

महाराष्ट्रात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (2009) लागू आहे. या कायद्यानुसार सहा ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार शाळेला नाही. शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेबाहेर काढता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news