

कुर्डूवाडी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने 5 सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करून यापूर्वीच नोंदणीकृत असलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाच्या विरोधात कुर्डूवाडी शहरात डॉक्टरांनी कडकडीत बंद पाळला. डॉक्टरने गुरुवारी बंद पाळल्याने रुग्णांचे अतोनात हाल झाले. उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी, डॉ आशिष शहा, डॉ. सचिन माढेकर, डॉ. रोहिदास दास, डॉ. लकी दोशी, डॉ. रवींद्र बोबडे. डॉ.परम बिनायकिया उपस्थित होते .
निवेदनात म्हटले आहे, एमबीबीएस कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी अधिक गुण लागतात. बीएचएमएस डॉक्टरला मात्र कमी गुणात प्रवेश मिळतो आणि तोच डॉक्टर नंतर अॅलोपॅथी डॉक्टरची औषधे वापरून प्रॅक्टिस करतो आता तर महाराष्ट्र शासनाने त्यांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे एमबीबीएस डॉक्टर व बीएचएएस डॉक्टर एकच प्रकारची प्रॅक्टिस करू शकतील व त्यांना कायद्याने संरक्षण प्राप्त होणार आहे.
या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होईल आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा व व्यवसायाचा दर्जा घसरेल. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल. अपुरे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे थेट जीवाशी खेळणे आहे. यामुळे 5 सप्टेंबरचे परिपत्रक तत्काळ रद्द करावे.