

टेंभुर्णी : सध्या डीजेचा सर्वत्र धडाका सुरू आहे. याचा लहान मुले, वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी काही जणांना आपला जीव ही गमवावा लागतो. यामुळे सर्वांनी डीजे मुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस यांनी केले.
गणेशोत्सव, ईद ए मिलाद सणांनिमित्त टेंभुर्णी पोलीस ठाणेअंतर्गत गावातील पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांची बैठक टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आयपीएस पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी पोलिसांच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे, डीजेचा वापर करणार्या मंडळावर गुन्हे दाखल करण्याचा गंभीर इशारा दिला.
पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी प्रस्ताविकात डीजे तर लावूच नये, सर्व गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा, समाजपयोगी उपक्रम राबवावेत.आवाजाची तीव्रता तपासण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्र लावण्यात येणार आहे असे सांगितले. तसेच बळजबरीने वर्गणी गोळा करू नये असे आवाहन केले.पोलीस पाटील यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, आरपीआयचे परमेश्वर खरात, यशपाल लोंढे, राजकुमार धोत्रे, मदन शहा, मुस्लिम समाजाचे युसुफ रास्तापूरे, पोसई स्वाती सुरवसे, पोसई अजित मोरे, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पदाधिकारी, प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन बिभिषण किर्ते व सुदर्शन पाटील यांनी केले.