

वाशिंबे : मोहोळ शहरातील प्रत्येक प्रभागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत नागरिकांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सांगूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना कुत्र्यांनी चावून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मोहोळ हे जवळजवळ 40 हजार वस्तीचे शहर असून विस्तारीत भागही वाढला आहे. त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांच्या संख्येत जास्तच वाढ झाली आहे. आठ दिवसांमध्ये दहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमराय नगर, दत्तनगर, यशवंतनगर, विश्वनाथ नगर, विद्या नगर, समर्थ नगर, क्रांती नगर या भागात मोकाट कुत्री अनेकांचा चावा घेत आहेत. त्यामुळे या भागात राहणारे अनेकजण जखमी होत आहेत. याबाबत उपाययोजना आखाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
9 हजार जणांना श्वानदंश
ॲड. अमर लंकेश्वर यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला श्वानदंशाच्या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यामध्ये सन 2021 ते 2025 अखेरपर्यंत शहरात तब्बल 9 हजार जणांना श्वानदंश झाल्याची माहिती देण्यात आली आहे.