

सोलापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील ग्रामीण व मराठवाडा बसस्थानकात असलेल्या वाहतूक नियंत्रक कक्षाच्या समोर दुपारी दीडच्या सुमारास मोकाट गाय आली व ती तेथेच बराच वेळ थांबून राहिली. ती प्रवाशांच्या गर्दीतच थांबल्याने महिला व वृध्द प्रवाशांमध्ये तिची भीतीही निर्माण झाली. मात्र, या गाईला हटकणारेही कोणीच नव्हते. अशा जनावरांमुळे प्रवाशांना अडचणी येतात. अशा जनावरांना मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रशासनाकडून रोखणे आवश्यक आहे.
दुपारच्यावेळी येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशाच गर्दीत मंगळवार रोजी भर दुपारी दीडच्या दरम्यान ग्रामीण व मराठवाडा बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रक कक्षाच्या समोरच एक मोकाट गाय आली. प्रवाशांच्या गर्दीतच बराच वेळ थांबून होती. थांबून राहिलेल्या गाईमुळे प्रवाशांना आपल्या गावाकडे जाणाऱ्या एसटीची चौकशी करण्यासाठी ये-जा करताना अडचणी येत होत्या. तरीही, बसस्थानक व परिसराची सुरक्षा पहाणारे कर्मचाऱ्यांनी या गायीला हटकून लावण्याची तसदी घेतली नाही. बसस्थानक व परिसरात मोकाट जनावरे येत असल्याने त्याचा प्रवाशांनाही त्याचा त्रास होतो. बसस्थानक प्रशासनाकडून स्थानकात येणाऱ्या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज आहे.
येथील बसस्थानकात दोन हजाराहून अधिक एसटी बसेस चोवीस तासात येऊन जातात. शिवाय, शेजारील कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा या राज्याच्या परिवहन महामंडळाच्या बसेसही येतात. म्हणून या बसस्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या काही हजाराच्या पटीत आहे. अशा महत्त्वाच्या बसस्थानकात मोकाट जनावरांना वेळीच अटकाव करणे गरजेचे आहे. तरच होणारे संभाव्य अपघात टळून जीवितहानी व वित्त हानी टळू शकेल. अन्यथा जनावरांमुळे कधीही अपघाताच्या घटना घडू शकतात.