

सोलापूर : देशमुख-पाटील वस्ती येथील 54 मीटर रस्त्याला अडथळा असलेली 18 अतिक्रमित घरे न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी (दि. 30) पोलिस बदोबस्तात जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली. अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकावर परिसरातील नागरिकांनी दगडफेक केली. दगडफेकीला पोलिसांनी प्रत्युत्तर देत दगडफेक करणार्यांवर लाठीचार्ज केला. तब्बल एक तास धावपळ, गोंधळ चालू होता. गोंधळ घालणार्या नागरिकांची पोलिसांनी कोंडी केल्याने महापालिकेने अतिक्रमण मोहीम यशस्वी केली.
सोलापूर महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळा, अरविंदधाम, देशमुख-पाटील वस्ती मार्ग, सीएनएस हॉस्पिटलपर्यंत डीपी रस्ता मंजूर आहे. हा रस्ता 54 मीटर आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेखालील बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे. बोगद्याजवळ सपाटीकरणाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. देशमुख-पाटील वस्तीमधील 180 मीटरचा रस्ता शिल्लक होता. या जागेवर 18 नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता रखडला होता. अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायालयाने परिस्थिती
जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने 478 च्या दोन नोटिसा अतिक्रमणधारकांना देत जागा खाली करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. अतिक्रमणधारकांना दोनवेळा संधी देऊनही जागा रिकामी केली नाही. त्यामुळे शुक्रवारी नगरअभियंता, अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त मोहिम घेत अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केले. अतिक्रमण काढताना घटनास्थळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, नगरअभियंता सारिका आकुलवार, अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी होते. यावेळी पोलिसाचा मोठा बंदोबस्त होता.