

गुळवंची : उत्तर सोलापूर तालुका परिसरामध्ये सध्या ज्वारीच्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. चिकटा रोगामुळे ज्वारीचे पाने पांढरे पडत असून ज्या पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे ते ज्वारीचे ताट तुटून जात असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांनी नेमकं कोणते पीक घ्यावं खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागेना असे चित्र आहे.सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी महापुराने राज्याच्या अनेक भागात अक्षरशः थैमान घातले. यामध्ये मोठे नुकसान झाले.शेती आणि शेतकऱ्यांना शासनाने जी मदत केली ती तुटपुंजी असून आजपर्यंत अजूनही अनेक शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
गतवर्षी देखील ज्वारीचे उत्पादन कमी झाल्यामुळे ज्वारीचा भाव जवळपास 40 ते 50 रुपये किलो पर्यंत गेला होता. पेरणी करण्यासाठी जवळपास एक महिना उशीर झाला आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी उभा राहिले आहे. त्यामुळे आता ज्वारीची पेरणी शेतकरी न करता गव्हाचे पेरणी करताना दिसून येत आहेत.
सध्या ज्वारीचे पीक सर्वत्र जोमात आले असून रात्रभर थंडी पडत असल्याने पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्वारीच्या पिकावर औषधाची फवारणी शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ना इलाज झाला आहे.तूर कांदा पिकावर सध्या किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. खताचे व औषधाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.