

अकलूज : सांगोला येथे पूर्ण झालेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये अत्यावश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच कर्मचारी भरती करून हे केंद्र तत्काळ सुरू करावे. या मागणीचे पत्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिले.
सांगोला येथे उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरची इमारत सुसज्ज असूनही अद्याप ते कार्यान्वित नाही. आवश्यक यंत्रसामग्री, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक कर्मचार्यांची कमतरता असल्यामुळे हे महत्त्वाचे ट्रॉमा सेंटर निष्क्रिय स्थितीत आहे. सांगोला तालुक्यातून नागपूर-रत्नागिरी आणि इंदापूर-जत हे दोन प्रमुख महामार्ग जात असल्यामुळे या भागातील वाहतूक प्रचंड आहे. परिणामी, अपघातांची शक्यता कायम असते.
अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असून, हे ट्रॉमा सेंटर नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकते. सध्या अपघातग्रस्त रुग्णांना सोलापूर, पंढरपूर, मिरज येथे हलवावे लागते, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेले सांगोला ट्रॉमा सेंटर तातडीने कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खा. मोहिते-पाटील यांनी केली आहे.