ST Toll Free Helpline: टोल फ्री लाईन तोकड्याच

प्रवासी संख्येच्या तुलनेत पाचच दूरध्वनी लाईन्स
ST
STPudhari
Published on
Updated on

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसमधून रोज लाखो प्रवाशांच्या तुलनेत तक्रार निवारण यंत्रणा तोकडी असल्याचे चित्र समोर आले आहे. एसटीचे २४ तास सुरू असलेल्या टोल-फ्री कॉल सेंटरवर दररोज किमान ५०० ते ६०० तक्रारी व चौकशी विषयीचे कॉल येतात. मात्र, हे कॉल हाताळण्यासाठी महामंडळाकडून केवळ पाचच दूरध्वनी लाईन्स व १६ कर्मचारी कार्यरत आहेत.

यातील एक लाईन सकाळी ६ ते सायंकाळी ५ यावेळेत विद्यार्थिनींसाठी राखीव आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रत्यक्षात चारच लाईन्स उपलब्ध राहतात. कर्मचारी पाळीपद्धतीने काम करत असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरही ताण येतो. बस उशिरा येणे, मार्गात बस बंद पडणे किंवा अन्य अडचणी निर्माण झाल्यास प्रवाशांना दीर्घकाळ कॉलवर राहावे लागते. काही वेळा ३० ते ४५ मिनिटांपर्यंत कॉल सुरूच राहतात.

परदेशातूनही एसटीच्या प्रवासाबाबत चौकशीचे कॉल येत असल्याचे सांगण्यात येते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत तक्रार निवारणाची सुविधा वाढविण्याची गरज आहे. कॉल सेंटरचे लाईन्स व कर्मचारी संख्या वाढविण्यासोबतच आगारनिहाय संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे, डिजिटल तक्रार नोंदणी आणि कॉल-बॅकची सुविधा सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.

मोबाईलवरूनही सेवा मिळावी

एसटीच्या प्रवाशांना प्रत्येक समस्येसाठी हेल्पलाईनवर संपर्क करावा लागतो. त्यावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी महामंडळाने तक्रार निवारणासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. मोबाईलवरून तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्यास कॉल सेंटरवरील भार कमी होऊ शकतो. तक्रारीचा क्रमांक देऊन तिची सद्यस्थिती पाहण्याची सुविधा, एसएमएसद्वारे अपडेट व गंभीर प्रकरणांसाठी संबंधित आगाराकडून थेट संपर्क अशी व्यवस्था केल्यास प्रवाशांना जलद प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे केवळ हेल्पलाईनच्या संख्येत वाढ करण्याऐवजी तंत्रज्ञानाधारित बहुपर्यायी तक्रार निवारण प्रणाली उभारणे अधिक प्रभावी ठरणार आहे. डिजिटल तक्रार नोंदणीचा पर्याय द्या.

कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तत्काळ तक्रार करण्याची सोय उपलब्ध होईल. टोल फ्री क्रमांकावर संपर्क होऊन संबंधित विभागाकडे ती तक्रार जाईपर्यंत तक्रारदार प्रवाशाचा प्रवास संपून जातो.
- संजय पाटील, अध्यक्ष, जिल्हा प्रवासी संघ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news