

सोलापूर : कॉपीमुक्त परीक्षेसाठी यापुढे परीक्षा केंद्रांवरच ऑनलाईन माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठविण्यात येईल. त्याठिकाणी प्रिंट काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीचा खर्च, वेळ आणि गुप्तता भंग होण्याचा धोका कमी होईल. याविषयी पहिला प्रयोग दहावीच्या आगामी पुरवणी परीक्षेप्रसंगी करण्यात येणार आहे. यामुळे पेपर फुटीला आळा बसण्याची शक्यता आहे.
दहावीच्या परीक्षेत होणाऱ्या कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून हे अभिनव पाऊल उचलण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावरच प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षेतील गैरप्रकार तसेच कॉपीच्या घटनांवर या नव्या पद्धतीमुळे प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संकल्पनेची सुरुवात दहावीच्या आगामी पुरवणी परीक्षेप्रसंगी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. पुरवणी परीक्षेतील दोन प्रश्नपत्रिकांसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जाणार असून, त्यानंतर त्याचे परीक्षण करून मार्च महिन्यातील मुख्य परीक्षांमध्ये ही प्रणाली सर्वसमावेशकरित्या राबवण्यात येईल.