

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 च्या नियोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत क्रीडा विभागातील अधिकारी कमी असल्यामुळे 49 खेळांच्या स्पर्धा घेण्याची जबाबदारी क्रीडा शिक्षकांनी आणि त्यांच्या संघटनांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले. यामुळे, प्रशासकीय अधिकार्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकांवर स्पर्धांचा भार सोपवण्याची वेळ आली आहे. ही शासकीय शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शाळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असताना, स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे समोर आले आहे. या बैठकीत शिक्षकांनी स्पर्धांमध्ये खेळाडूंना भेडसावणार्या अडचणींवर चर्चा केली. यामध्ये मैदानावर स्वच्छतागृह, वैद्यकीय सेवा, पोलीस संरक्षण आणि पाण्याची व्यवस्था असावी, अशा प्रमुख मागण्या अशा क्रीडा शिक्षकाकडून करण्यात आल्या. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार नदीम शेख, प्रभारी क्रीडाधिकारी मच्छिंद्र घोलप, शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, सोलापूर शहर शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे शहर अध्यक्ष प्रा. संतोष खेंडे तसेच यासोबतच शहरातील दोनशेहून अधिक क्रीडाशिक्षक यांची उपस्थित होते.