

सोलापूर : सोलापूर हा संतांचा, देवी देवतांचा जिल्हा असल्याने अध्यात्मिक पर्यटन वाढीसाठी अध्यात्मिक पर्यटन सर्किट तयार करण्यात येणार आहे. पर्यटक सोलापुरात आल्यानंतर तो किमान तीन दिवस जिल्ह्यात पर्यटनाचा आंनद घेईल, अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.
पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, बार्शीचे भगवंत, सोलापूरचे सिद्धरामेश्वर, श्रीक्षेत्र अरणचे सावता महाराज, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, लगतच्या कर्नाटकचे परंतु जिल्ह्याच्या सीमेपासून अतिशय जवळ असणाऱ्या गाणगापूर या तिर्थक्षेत्री भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना टुरिझिम गाईड, पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी मोबाईल, पर्यटन स्थळांचा एकत्रित दिशादर्शक फलक आदी सुविधा उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
उजनी धरणात जलपर्यटनासाठी प्रयत्न करणार असून, लोकांना रोजगार उपलब्ध होतील, अशा प्रकल्पांसाठी काम करणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीनवर प्रक्रीया करुन त्यातून अधिक नफा शेतकऱ्यांना कमविता येतो. कृषी आधारित प्रक्रीया उद्योगांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास करुन रोजगार उपलब्ध होतील, अशी काम करणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉरविषयी गुरुवारी बैठक
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प हा ठरलेल्या टाईम बाँन्डमध्ये आणि सर्वांच्या सहमतीने पूर्णत्वास नेला जणार आहे. या प्रकल्पाबाबत येत्या गुरुवारी (दि. 16) आढावा बैठक घेणार आहे. बुधवारी (दि. 15) पंढरपुरात जाऊन पालखी मार्गासह आषाढी वारीच्या तयारीच्या अनुषंगाने बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.