

पोखरापूर : भरधाव कंटेनरने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२३) सायंकाळी ४:३० च्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत घडली. आब्बास गुलाब मणियार (वय ५८, रा.काळेवाडी) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालक पहाडसिंग सोहन सिंग (रा. मियापुर जि. बिकानेर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहोळ तालुक्यातील काळेवाडी येथील आब्बास मणियार हे सोमवारी दुचाकी (क्रमांक एम. एच.१३, डी. जे.९०४३) या दुचाकीवरून चिखली गावाकडून मोहोळकडे निघाले होते. यादरम्यान पाठिमागून भारधाव वेगात आलेल्या कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात रस्त्यावर आपटून मणियार गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी वाहनाने तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कंटेनर चालकावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.