

सोलापूर : राज्यात वाढत्या कर्करूग्णांच्या संख्येचा विचार करून राज्य शासनाने या आजाराने त्रस्त सामान्य कुटुंबातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत. याच उद्देशाने राज्यातील मुंबईच्या जे. जे. रुग्णालयासह नागपूर, संभाजीनगर अशा विविध आठरा रुग्णालयांमध्ये विशेषोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासकीय स्तरावरून घेण्यात आला.
कर्करोग उपचार सेवांचा बहुपातळी विस्तार व नवीन संस्था आणि पायाभूत सुविधा उभारणीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली. कर्क रोगाने त्रस्त रुग्णांवर राज्यातील 18 रुग्णालयांमधून तीन स्तरावरुन (एल 1, एल 2 व एल 3) अशा पद्धतीचे दर्जेदार उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे आणि संशोधनाला गती देणे यासाठी धोरण आणण्याच्या प्रक्रियेला शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या नागपूर, मुंबई (जे.जे. रुग्णालय), संभाजीनगर, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे (बैरामजी जीजीभॉय), नांदेड या शहरातील सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न असलेली रुग्णालये व नाशिक, अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालये (एल 2) लेव्हल 2: अधिक जटिल समस्यांचे निराकरण करते, ज्यासाठी विशेष कौशल्ये आणि अनुभव आवश्यक असतो.
निधी उभारण्याची मुभा
सेवांचा समन्वय साधण्यासाठी व तसेच पीपीपी पद्धतीने मनुष्यबळ, उपकरणे व व्यवस्थापन पुरवण्यासाठी कंपनी कायदा 2013 अन्वये महाराष्ट्र कॅन्सर केअर व रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर) ही कंपनी स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली. सुरूवतीला 100 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील 20 टक्के शुल्क तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याची मुभा यासाठी देण्यात आली आहे. मुंबई, सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी अंबाजोगाई, ठाणे व यवतमाळ येथील महाविद्यालयांना संलग्न रुग्णालये व शिर्डी संस्थानचे रुग्णालय एल 3 स्तरावर कार्यरत होणार आहेत.
मानद सल्लागार नेमण्याची प्रक्रिया
नेमणुक प्रक्रिया ही कर्करोग उपचार व प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या कॅन्सर केअर या प्रकल्पाला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी आरोग्य विभागाकडून मानद सल्लागार नेमण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.