

सोलापूर : कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापूरसह जिल्ह्यातून भाविक जात आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-टुंडला कुंभमेळा विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. यामुळे सोलापूर, कुर्डूवाडी, तसेच आसपासच्या भागातून प्रयागराज येथे जाणार्या भाविकांची सोय होणार आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या समारोपास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्याने प्रयागराज येथे जाणार्या भाविकांची संख्या वाढली आहे. सोलापूरहून जरी थेट रेल्वे नसली तरी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-टुंडला-म्हैसूर महाकुंभ विशेष एक्स्प्रेस धावणार असल्याने सोलापूरकरांना दौंड कॉर्डलाईन येथे जाऊन तिथून पुढे प्रयागराजला जाता येणार आहे. म्हैसूर-टुंडला स्पेशल एक्स्प्रेस 17 फेब्रुवारीला म्हैसूरहून रात्री 9:40 वाजता सुटेल आणि 20 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता टुंडला येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने टुंडला-म्हैसूर स्पेशल एक्स्प्रेस टुंडला येथून 21 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि 23 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता म्हैसूरला पोहोचेल. या गाडीस तीन एसी थ्री टायर कोच, 10 स्लीपर कोच कोच, दोन जनरल सेकंड क्लास कोच आणि दोन एसएलआर/डी डबे यासह 17 डबे असतील.
मंड्या, रामनगरम, केंगेरी, केएसआर बंगळूर, यशवंतपूर, तुमाकुरू, अर्सिकेरे, कदूर, चिकजाजूर, दावणगेरे, हरिहर, रानीबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, अलनावर, लोंडा, खानापूर, बेळगाव, गोप्रगहट, खानापूर, मिरज, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा हे थांबे दोन्ही दिशेने असतील.
सोलापूरहून दौंडला जाण्यासाठी भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस ही सोलापुराहून सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी निघते. कुर्डुवाडीला सायंकाळी सहा वाजून 27 मिनिटांनी पोहोचते; तर दौंड स्थानक येथे रात्री नऊ वाजून 45 मिनिटांनी पोहोचते. या गाडीने सोलापूरवरून दौंडला जाऊन तेथून रात्री 10 वाजता म्हैसूर-टुंडला एक्स्प्रेसने सोलापूरकरांना प्रयागराजला जाता येणार आहे.