

माळशिरस : रत्नत्रय महिला केसरीसाठी अंतिम लढत पै. सोनाली मंडलिक विरुद्ध पै. सिद्धी होळकर यांच्यामध्ये झाली. या अटीतटीच्या लढतीत क्लजीन डावावरती पै. सोनाली मंडलिकने रत्नत्रय केसरीच्या किताबाचा मान पटकावला. यासाठी तिला एक लाख रुपये व चांदीची गदा सन्मानचिन्ह देऊन शीतलदेवी मोहिते- पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
रत्नत्रय परिवाराचे प्रमुख अनंतलाल दोशी यांचा अमृत महोत्सव सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये सदाशिवनगरीमध्ये पार पडला. यानिमित्त घेण्यात आलेल्या महिला कुस्ती स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. रत्नत्रय स्कूलच्या प्रांगणात दोशी यांचे औक्षण करून सर्व शिक्षकांनी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी वीरकुमार दोशी, प्रमोद दोशी, विनयश्री दोशी, पुनम दोशी, निर्जरा दोशी, पुष्कर दोशी, रत्नेश दोशी, श्रृती दोशी उपस्थित होते. हम साथ साथ है, या गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच स्कूलमधील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
यानंतर रक्तदान शिबिरात 100 जणांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिल्या. यानंतर रत्नत्रय इंग्लिश मीडियम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे, रत्नत्रय पतसंस्था, नागरिकांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अनंतलाल दोशी यांच्या जीवनावर सविता देसाई यांनी ‘रत्नत्रय जीवनगाथा 75 वर्षांची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेे. या कार्यक्रमासाठी जयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रामभाऊ सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते- पाटील, डॉ. एन. के. इनामदार, डॉ. सतीश दोशी, डॉ. विकास शहा, डॉ. श्रेणिक शहा, बाबूभाई गांधी, धनंजय देशमुख, नितीन दोशी, सुहास भाई शहा, सुभाष गांधी, मिहीर गांधी, महावीर शहा, देवीदास ढेपे आदी उपस्थित होते.
पै. सोनाली मंडलिकने रत्नत्रय केसरीच्या किताबाचा मान पटकावला. यासाठी पंच म्हणून पै. नारायण माने यांनी काम पाहिले. दोन नंबरच्या कुस्तीची लढत पै. धनश्री फंड विरुद्ध पै. अहिल्या शिंदे यांच्यामध्ये झाली. पै. धनश्री फंड हिने गुणांवर विजय मिळवला. तिला 75000 रुपये रोख, चांदीची गदा व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यासाठी पंच म्हणून पै. सुहास तरंगे यांनी काम पाहिले.