

सोलापूर : बापाच्या आजारपणास कंटाळून मुलाने लोखंडी पाईपने बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जुना विडी घरकूल येथे घडला. नंदकुमार गायकवाड, असे खून झालेल्या बापाचे नाव आहे. तर मनोज नंदकुमार गायकवाड (वय 38, रा. गोंधळी वस्ती, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मुलाचे नाव आहे.
नंदकुमार गायकवाड हे आजारी होते. त्यांचे खाणे, बाथरुमला घेऊन जाणे यामुळे मनोज हा वैतागला होता. त्यांच्या आजारामुळे मनोज कायम डिप्रेशनमध्ये असायचा. यातूनच मंगळवारी (दि. 6) रात्री साडेआठच्या सुमारास मनोज याने नंदकुमार यांच्या हातावर तसेच अवघड जागेवर लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नंदकुमार यांची पत्नी अरुणा नंदकुमार गायकवाड (वय 60, रा. कुमठा नाका, सोलापूर) हिने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांना मनोज याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे करीत आहेत.
पतीच्या त्रासाला कंटाळून आई मुलीकडे
मनोज गायकवाड हा अविवाहीत आहे. आजारी वडील नंदकुमार हे त्याच्याजवळ राहत होते. नंदकुमार हे पत्नी अरुणा हिला देखील सारखे त्रास देत होते. त्यामुळे अरुणा या मुलीकडे कुमठा नाका येथे राहत होत्या. मनोज आणि नंदकुमार दोघेच राहत होते. आई अरुणाला दिलेला त्रास आणि आता स्वतःला होत असलेला त्रास सहन न झाल्याने मनोज याने नंदकुमार यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.