

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची तब्बल आठ वर्षांनी निवडणूक लागली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 68 गट आणि पंचायत समितीचे 136 गण असून, तेथील इच्छुक निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी (दि.13) जाहीर केला आहे. त्यामुळे तयारी केलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कालावधी 21 मार्च 2022 ला संपुष्टात आला होता. त्यानंतर जवळपास चार वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासक होते. माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांकडून जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे त्यातील काही सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी 68 गटांमधून तर पंचायत समितीसाठी 136 गणांमधून सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे.
जिल्हा परिषदेत सन्नाटा
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता दुपारी चारनंतर लागल्यामुळे विभागप्रमुख, अधिकारी साडेचार नंतर गायब झाल्याचे चित्र अनेक विभागात दिसले. तर आचारसंहिता लागणार असल्याची माहिती कळताच काही अधिकारी दुपारीच झेडपीतून निघून गेले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सोमवारी सायंकाळी सन्नाटा पाहायला मिळाला.
भाजप पुन्हा सत्तेवर येणार का
सन 2017 मध्ये राष्ट्रवादीचे सुमारे 25 तर भाजपाचे 14 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. त्यावेळी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी समविचारी आघाडीची मोट बांधून जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणली होती. त्यामुळे आता पुन्हा जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता येणार का, अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे.
गेल्या टर्मचे झेडपीमधील पक्षनिहाय बलाबल
भाजप-आघाडी : 19
शिवसेना-आघाडी : 10
राष्ट्रवादी : 25
काँग्रेस : 07
भीमा परिवार : 03
शेकाप : 03
अपक्ष : 01
एकूण : 68
निवडणूक कार्यक्रम असा
- अर्ज स्वीकारणे : 16 ते 21 जानेवारी
- अर्ज छाननी : 22 जानेवारी
- उमेदवारी अर्ज माघार घेणे : 27
- अंतिम यादी जाहीर, चिन्ह वाटप : 27
- मतदान : 5 फेब्रुवारी
- मतमोजणी : 7 फेब्रुवारी