

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सात हजार 500 बॅलेट अन् तीन हजार 366 कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान यंत्राच्या साहित्याचे वाटप जिल्ह्यातील प्रत्येक तहसील पातळीवर शुक्रवारी (दि. 6) करण्यात आले असून, त्या त्या तहसील पातळीवरच सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे.
68 गट आणि 136 गणांसाठी आज, शनिवारी (दि. 7) जिल्ह्यातील दोन हजार 758 मतदार केंद्रांवर 24 लाख 59 हजार 227 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाने एक हजार 379 मतदान केंद्रांवर वेब कॉस्टिंगची व्यवस्था केली आहे. मतदानावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध अन्य पक्ष असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस ही सर्व पक्ष सोयस्करपणे काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत यंदा विविध ठिकाणी रंगत पाहायला मिळत आहे.
तालुकानिहाय मतदार संख्या
करमाळा - दोन लाख 80 हजार 23, माढा - 2 लाख 58 हजार 714, बार्शी - 2 लाख 14 हजार 754, उत्तर सोलापूर - 88 हजार 992, मोहोळ - 1 लाख 98 हजार 338, पंढरपूर - 2 लाख 85 हजार 826, माळशिरस - 3 लाख 18 हजार 281, सांगोला - 2 लाख 62 हजार 367, मंगळवेढा - 1 लाख 69 हजार 536, दक्षिण सोलापूर - 2 लाख 23 हजार 367, अक्कलकोट - 2 लाख 31 हजार 29 असे एकूण 24 लाख 59 हजार 227 मतदार जिल्ह्यात आहेत.
तालुकानिहाय मतदान केंद्रे
करमाळा - 244, माढा - 269, बार्शी - 256, उत्तर सोलापूर - 97, मोहोळ -220, पंढरपूर -309, माळशिरस -363, सांगोला- 274, मंगळवेढा-189, दक्षिण सोलापूर - 247, अक्कलकोट -290 असे एकूण दोन हजार 758 मतदार केंद्र आहेत.