Solapur ZP Election : सोलापुरात भाजपच धुरंधर...!

भाजपच्या 64 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच दणदणीत विजय
Solapur ZP Election
Solapur ZP Election
Published on
Updated on

सोलापूर : शत प्रतिशतचा नारा प्रत्यक्षात साकार करत भाजपने अखेर 64 वर्षांनंतर प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचे कमळ फुलविले. जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 38 जागा त्याही कमळ चिन्हावर जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्तेला भाजपने सुरूंग लावला.

सन 2017 साली भाजपने तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समविचारी नेत्यांची आघाडी करत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून भाजप पुरस्कृत समविचारींची सत्ता आणली होती. तेव्हा संजयमामा शिंदे हे अध्यक्ष बनले होते. यंदा मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश संपादन करत भाजपची निर्विवाद सत्ता जिल्हा परिषदेवर आणली आहे. अक्कलकोटमध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहा पैकी चार गटांवर विजय संपादन केला. माजी मंत्री तथा शिंदे शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी वागदरी आणि सलगर गटावर विजय संपादन करून आपले अस्तित्व राखले. उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून माजी जि. प. सदस्य आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे शिंदे शिवसेनेत प्रवेश करून विजय संपादन करत आपला वागदरी गट शाबूत ठेवला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आ. सुभाष देशमुख यांनी आपले वर्चस्व टिकवून ठेवत सहा पैकी पाच जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत. शिंदे शिवसेनेनेही माजी आ. रतिकांत पाटील यांची पत्नी लक्ष्मी पाटील यांना निवडून आणत आपले अस्तित्व दाखवून दिले. उत्तर सोलापूर तालुक्यात काँगेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी आ. दिलीप माने यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार यांच्या साथीने वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी तालुक्यातील तिन्ही गटांवर कमळ फुलविले. मोहोळमध्ये माजी आ. राजन पाटील यांनी तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध करत सहा पैकी चार गटांवर निर्विवाद यश मिळवले. तालुक्यातील सर्वाधिक हॉट लढतीमध्ये माजी आ. पाटील यांनी त्यांचे पारंपारिक राजकीय वैरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना कुरूल गटात चारीमुंड्या चीतपट केले. तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि शिंदे शिवसेनेचे प्रत्येकी एकेक उमेदवार निवडून आले.

बार्शी तालुक्यातील सहा पैकी सहा जागांवर भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली दणदणीत यश मिळवले. या तालुक्यात भाजप विरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊनही भाजपने मिळवलेले हे दणदणीत यश उल्लेखनीयच आहे. माढा तालुक्यात सहा पैकी चार जागी भाजपने रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली यश मिळवले तर उर्विरत दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने पदरात पाडून घेण्यात यश मिळवले. आ. अभिजीत पाटील विरूद्ध सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष शिंदे यांच्यात येथील सरळ सरळ लढत झाली. यात शिंदेंनी दणदणीत विजय मिळवला.

करमाळ्यात आ. नारायण पाटील, माजी आ. संयमामामा शिंदे, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी आपापले वर्चस्व टिकवून ठेवण्यात यश मिळवले. रश्मी बागल या स्वतः पांडे गटातून भाजपाकडून निवडून आल्या. तर आ. पाटील, माजी आ. शिंदे यांच्या गटाला प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या. सांगोला तालुक्यात माजी आ. शहाजीबापू पाटील आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने यांनी नगरपरिषद निवडणुकीप्रमाणेच याही निवडणूकीत आपला करिश्मा दाखविला. त्यांना सात पैकी चार जागा मिळाल्या. शेकापचे आ. बाबासाहेब देशमुख आणि ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी आ. दीपक साळुंके-पाटील यांच्या नेतृत्तावाखालील आघाडीला तीन जागा मिळाल्या.

माळशिरस तालुक्यात नऊ गटांपैकी सहा गटांवर दणदणीत विजय मिळवत मोहिते-पाटील घराण्याने आपला करिश्मा दाखवून दिला. तालुक्यात भाजपाने चंचू प्रवेश करत दोन उमेदवार निवडून आणले. या तालुक्यात एक उमेदवार शिंदे शिवसेनेचा निवडून आला आहे. मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी चारपैकी चार जागा जिंकून तालुक्यावर आपली भक्कम पकड असल्याचे सिद्ध केले. शेजारच्या पंढरपूर तालुक्यात भाजपने आठपैकी तीन जागांवर विजय मिळवला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाने चार जागा मिळवल्या. भगीरथ भालके यांच्या नेतृत्तावाखालील तीर्थक्षेत्र विकास आघाडीने एक जागा मिळवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news