

अनिकेत गायकवाड
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. सोलापूर शहर जिल्हा भाजप कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ, बार्शी, माळशिरस, माढा, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपकडून घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे उत्तर सोलापूर मतदारसंघातील मुलाखती काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
भाजपकडून एका जागेसाठी तब्बल 10 ते 12 इच्छुक उमेदवार असल्याने भाजपमध्ये प्रचंड चुरस दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 138 जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून, योग्य व जिंकाऊ उमेदवार देण्यावर पक्षाचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.या मुलाखतींमुळे भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर ताकद दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.