

सोलापूर : उमेद अभियान अंतर्गत रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचे येत्या सोमवारी (दि. 13), मंगळवारी (दि. 14) जिल्हा परिषदेच्या परिसरात आयोजन केले आहे. त्यामुळे झेडपीत आकाशकंदील, पणत्या अन् फराळीचे साहित्य मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहायता समूह उत्कृष्ट उत्पादने तयार करत आहेत. दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात भेटवस्तू व इतर साहित्य आदान प्रदान केल्या जातात. यामध्ये फटाके वगळता बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ, पणत्या, आकाश कंदील आदी वस्तू व साहित्य जिल्ह्यातील अनेक स्वयंसहायता समूह बनवीत आहेत. त्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा परिषद आवारात त्यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 25 स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री, प्रदर्शन करण्यासाठी स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे.
दिवाळी महोत्सव राबवण्याबाबतचा उद्देश महिला स्वयंसहायता गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ व बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे. तसेच सोलापूर शहरातील व परिसरातील नागरिकांना दिवाळी आनुषंगिक पदार्थ व साहित्य कमी भावात व चांगल्या दर्जाचे उपलब्ध होणार आहे. रुक्मिणी दिवाळी महोत्सव मध्ये फटाके वगळता दिवाळी फराळ व इतर दिवाळी साहित्य तसेच समूहाकडून उत्पादित केलेली विविध वस्तू व पदार्थ मिळणार आहेत.
महोत्सवासाठी हे घेताहेत परिश्रम
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, अनिता माने, शीतल म्हता आदी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.