

अमोल साळुंखे
सोलापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७६८ शाळा आहेत. मागील तीन वर्षांत या शाळांतील एक लाख ३७ हजार ५७६ इतकी पटसंख्या घटल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने पटसंख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या चिंताजनकरीत्या घटत असल्याची माहिती समोर आली असून, भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
लढ्यात मागील तीन वर्षांत शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल एक लाख ३७ हजारांपेक्षा जास्त कमी झाली असून, शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेत 'शाळा प्रवेशोत्सव' प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय शाळांमधून विद्यार्थ्यांचा खासगी शाळांकडे वाढता कल, स्थलांतर, कमी जन्मदर तसेच पालकांच्या बदलत्या शैक्षणिक अपेक्षा ही या घटीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. परिणामी अनेक ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या कमी होत असून काही ठिकाणी वर्ग एकत्रित करण्याची वेळ शाळांवर आली आहे.
पटसंख्या वाढीसाठी प्रवेशोत्सव मोहीम
प्राथमिक शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव, घरभेटी, पालक जनजागृती, शाळा भेटी आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळांकडे आकर्षित करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.