

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचा यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात तृतीय क्रमांक तर पंढरपूर पंचायत समितीचा पुणे विभागात द्वितीय क्रमांक आला आहे. मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पालकमंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशाधीन शेळकंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत सन 2023-24 मधील राज्यस्तर, विभागस्तरावरील पुरस्कार जाहीर झाले होते. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचा तृतीय क्रमांक तर पंढरपूर पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला होता.
यशवंत पंचायत राज अभियान हे 2005-06 पासून राज्यात सुरू झाले आहे. या अभियानास 200 गुणांची प्रश्नावली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेला 170 गुणांसह तृतीय क्रमांक मिळाला. 17 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. पंढरपूर पंचायत सतिमीचा द्वितीय क्रमांक आला असून, त्यास आठ लाखांचे बक्षीस मिळाले. या पुरस्कारासाठी सर्व अधिकारी, कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.