

सोलापूर : तुरीच्या बिलापोटी जमा झालेले ७ लाख रुपये बँकेतून काढण्यासाठी दिलेल्या चेकद्वारे रक्कम काढून तरुण पसार झाल्याचा प्रकार सोलापूर मार्केट यार्ड परिसरात घडला. या प्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात नागराज रविंद्र पाटील (वय २६, रा. तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता मार्केट यार्ड येथे हा प्रकार घडला. काशीनाथ शरणप्पा बिराजदार (वय ४४, रा. हालहाळळी, ता. अक्कलकोट) यांच्या ‘प्रितम गौडा ट्रेडर्स’च्या नावे ‘के. बी. सी. ॲग्रो, सोलापूर’ यांच्या तुरीच्या बिलापोटी ७ लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील खात्यातून काढून आणण्यासाठी बिराजदार यांनी नागराज पाटील याला चेक दिला होता. पाटील याने बँकेतून ७ लाख रुपये काढले.
मात्र, रक्कम फिर्यादीकडे न देता ती घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. विश्वासाने दिलेल्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बिराजदार यांनी तक्रार दिली. याप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत.