

कासेगाव (ता. द. सोलापूर) : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सर्व स्तरांवर दक्षता वाढविण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर- येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील तुळजापूर नाका येथे वाहनांची काटेकोर तपासणी सुरू आहे.
निवडणूक आयोगाने स्थापन केलेल्या स्थिर देखरेख पथक (एसएसटी) व सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या संयुक्त पथकामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच हैद्राबाद व आंध्रप्रदेश येथून सोलापूर शहरात प्रवेश करणाऱ्या चारचाकी व सहाचाकी वाहनांची सरसकट तपासणी केली जात असून, संशयास्पद दुचाकी वाहनांचीही स्वतंत्रपणे तपासणी करण्यात येत आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून ही तपासणी सातत्याने सुरू असून, निवडणूक काळात होणारी काळ्या पैशाची वाहतूक, परवाना नसलेल्या मौल्यवान वस्तू, अंमली पदार्थ तसेच बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी रोखणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. तपासणी दरम्यान वाहनांचे प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण होत आहे. तपासणीवेळी वाहन चालकाचे नाव, वाहनाची कागदपत्रे, प्रवासाचा उद्देश व मार्ग यांची पडताळणी होत आहे. वाहनांची डिक्कीची तपासणी होत आह. संशयास्पद बाबी आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.