

सोलापूर : रे नगरचा रखडलेला प्रश्न, विडी व यंत्रमाग कामगारांचे वेतन, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना आणि असंघटित कामगारांच्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी सोलापुरातून मुंबईच्या दिशेने निघणारा कामगारांचा लाँग मार्च जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केला.
सात हजारांहून अधिक कामगार, कष्टकरी महिला आणि रे नगरमधील लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी १७ नोव्हेंबरला मागण्यांबाबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, ३१ डिसेंबरपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता मंत्रालयावर धडक देऊ, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली. अनेक कामगार मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या तयारीने जेवणाचे डबे आणि आवश्यक साहित्य घेऊन आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली. प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने क्रांतिकारी गीते सादर करून आंदोलनात उत्साह निर्माण केला. प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू करून लाँग मार्चला परवानगी नाकारली होती.
अखेर जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी सीटूचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख, जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी केले.