

सोलापूर : शहरातील गजबजलेल्या आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यामध्ये मंगळवारी (दि. 5) सायंकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपा भवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या नाल्यात एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांना दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.
पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.मृत महिला कोण आहे, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले, आजूबाजूच्या परिसरात कुणी महिला बेपत्ता आहे का, याचीही चौकशी सुरू केली आहे.