

सोलापूर : महिला कंडक्टरला मारहाण करुन बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील तुळजापूर नाका येथे ही घटना घडली. बसच्या महिला कंडक्टर साधना अशोक अनंतवाळ (रा. उदगीर, लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. साधना या सोलापूर उदगीर बस (एमएच 25 एयू 7974) घेऊन उदगीरकडे निघाल्या होत्या. यावेळी सोलापुरात काजल नागनाथ साबळे व कुशाल गौतम डावरे (दोघे रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हे बसमध्ये बसले. जुना तुळजापूर नाका येथे त्यांना तिकीट काढण्याबाबत विचारले असता आमच्याकडे पैसे नाहीत बस थांबवा म्हणून आरडाओरड सुरू केली.
साधना अनंतवाळ यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. बसमधून खाली उतरून दगडफेक करून बसची काच फोडली. ‘तुमची बस जाळून टाकतो’, असे म्हणून धमकी दिली. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.