

बार्शी : वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चिडून आपल्या दोन मुलांसमोर भर रस्त्यात पत्नीचा कोयत्याने वार करून निर्दयी खून केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकलपट्टी रेड्डी यांनी पतीने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. किरण तुकाराम घरबुडवे (वय 43 रा. भातंबरे ता. बार्शी) असे पतीचे नाव आहे. तर सोनाली घरबुडवे असे मयत पत्नीचे नाव आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये खुनाची घटना घडली होती.
याबाबत माहिती अशी, सोनाली ही वडीलांचे जमिनीमध्ये हिस्सा घेत नव्हती. याचा राग मनात धरून धामणगाव या सासरवाडीतून पत्नी व दोन मुलांसह मोटारसायकलवरून घरी जात असताना किरणने कोयत्याने पत्नी सोनालीला डोक्यात, मानेवर वार करून गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेमध्ये पत्नीला बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले होते. अतुल दिलीप हेडंबे यांनी किरण घरबुडवे याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तपासी अधिकारी पो. नि. विनय बहिर यांनी आरोपीस ताब्यात घेतले. या खटल्यात फिर्यादी, आरोपीची मुलगी, इतर साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहाय्यक सरकारी वकील म्हणून दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दहा हजार दंड करण्यात आला. उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, कुंदन गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. कोर्ट पैरवी म्हणून हवालदार कुणाल पाटील यांनी काम पाहिले.