

सोलापूर : पती नपुंसक असल्याचे नातेवाईकांना सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या माहेरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोलापुरात घडली होती. यात गंभीर जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि. 21) मृत्यू झाला. नर्गिस फैजान शेख (वय 32) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
नर्गिस व फैजान शेख यांचा 7 सप्टेंबर 2024 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर दोनच महिन्यांत ते विभक्त राहत होते. पती नपुंसक असल्याचे पत्नी नर्गिसचे म्हणणे होते. याबाबत तिने माहेरी आणि काही नातेवाईकांना सांगितले. 17 एप्रिल रोजी फैजान सासरी आला. पत्नीसोबत घरात बोलत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यातून संतापलेल्या फैजानने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली काढली आणि तिच्यावर ओतून पेटवून दिले. नर्गिस हिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात नर्गिस ही 50 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नर्गिस हिच्या फिर्यादीवरून पती फैजान याच्यासह सासरा जावेद, सासू शमशाद, दीर फुरखान, जाऊ उमेरा, नणंद असिफा, तेहसिन, मीना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उपचारादरम्यान मंगळवारी नर्गिस हिचा मृत्यू झाला. पती फैयाजला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.