Solapur Water Shortage : विहिरी, बंधारे पडले कोरडेठाक

पिलीव परिसरात ऐन पावसाळ्यातच पाण्याची समस्या गंभीर
Solapur Water Shortage : विहिरी, बंधारे पडले कोरडेठाक
Published on: 
Updated on: 

पिलीव : पिलीव व परिसरात गेल्या महिन्यापासून कसलाच पाऊस पडला नाही. त्यामुळे परिसरातील ओढे-नाल्यांसह तलाव कोरडे पडले असून ऐन पावसाळ्यातच विहिरीचे पाणी आटले आहे. इंधन विहिरीला पाणी राहिलेले नाही. त्यामुळे जनावरांसह ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून हाता-तोंडाला आलेली पिके जळून सुकून चालली आहेत. पिकाच्या पाण्याची व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली आहे.

माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात चालू पावसाळा हंगाम संपत आला तरी या हंगामात अत्यंत अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची बाजरी, मका, कडधान्य, ऊस, फळबागा यासारखी पिके घेतली होती. अधूनमधून पावसाच्या थोडा बहुत प्रमाणात सरी पडल्याने पेरलेली खरीप पिके उगवून येऊन कशीबशी फुलोऱ्या पोग्यापर्यंत वाढली होती.

अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागला असून चाऱ्याचे दर गगनाला भिडले असून मका, कडवळ व ऊस सुमारे दोन ते तीन हजार रुपयांपेक्षा जास्त एका गुंठ्याने विकली जात आहेत. मात्र शेळ्या-मेंढ्यांना चरायला मोकळ्या रानातून गवतच शिल्लक राहिले नसल्याने दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर मेंढरे घेऊन मेंढपाळ काळ्या रानाला तेव्हा जिकडे चारा मिळेल त्या भागाला मेंढरे घेऊन जातात. मात्र सध्या पाऊसच पडला नसल्याने दिवाळीपूर्वीच मेंढपाळ मेंढरे घेऊन निघाले काळ्या रानाला तर माणसे चालली ऊसतोडीला व मिळेल त्याठिकाणी रोजगार शोधायला.

महालक्ष्मी मंदिर परिसरातील लगतचा श्री महालक्ष्मी तलाव, महाडिक तलाव व सर्वच तलाव कोरडे पडल्‍याने त्या तलावात पोटालगत गुडघाभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याचे दिसत आहे. लाखो भाविकांचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मार्च महिन्यात भरते. जनावरांची व भाविकांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. त्यावेळी पाण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज लागते. त्यावेळी महालक्ष्मी तळे कोरडे पडल्याने तीव्र पाणीटंचाई भासणार असून पाण्याविना यात्रा कशी भरणार, असा एक प्रश्न यात्रा कमिटी व जनतेतून विचारला जात आहे. त्याचप्रमाणे बचेरी, शिंगोर्णी, पठाण वस्ती, मगरवाडी, गारवाड या भागातही पुरेसा पाऊस पडला नसल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले नाही. त्यामुळे तलाव, बंधारे, इंधन विहिरी कोरड्या पडलेल्या दिसत आहेत. जनावरांबरोबरच शेतकरी, बागायतदार, रोजगारी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याच्या तयारीला लागले असून मुंबई, वसईला जास्त स्थलांतर करण्याचा मार्ग पत्करणाचा विचार करताना दिसत आहेत.

ज्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पिकाचे पंचनामे करून दुष्काळनिधी म्हणून नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर, कामगार, रोजगारी यांना शासनाने सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी आंबेडकरी चळवळीचे नेते सामाजिक कार्यकर्ते विकास दादा धाईंजे, ह्युमन राईटचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे, उपसभापती मनीषा मदने-पाटील, अमोल मदने-पाटील, जिल्हाध्यक्ष रणजित सातपुते यांनी केली आहे.

येत्या १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होणार असल्याने ऊस तोडणी सुरू होणार आहे. यामुळे चाऱ्याचा रोजगाराचा प्रश्न तात्पुरता सुटेल. जास्तीत जास्त कारखाने जानेवारीपर्यंत चालतील. उन्हाळ्यात पाण्याचा व शेतमजुरांच्या रोजगाराचा चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे शासनाने पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करावी. चाऱ्यासाठी गुरांच्या देखभालीसाठी गुरांचा सर्वे करून जनावरांच्या मालकाच्या खात्यावर प्रत्येक जनावरापाठीमागे सानुग्रह अनुदान द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. चारा छावण्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान द्यावे, अशी मागणी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news