

सोलापूर : जून महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला असतानाही सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत नाही. सोमवार १५ जून रोजी सोलापूर शहरात कमाल ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि शुक्रवारी येलो अलर्टचा इशारा देऊनही प्रत्यक्षात उन्हाची तीव्रता वाढल्याने कायम असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. सोलापुरातील तापमान वाढत असून ३९ ते ४० अंशांकडे वाटचाल सुरू केली आहे.
सकाळपासूनच सूर्याने कडक उन्हाची चाहूल दिली होती. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने रस्त्यांवरील वर्दळ काहीशी कमी झाल्याचे दिसून आले. बाजारपेठा, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिक सावलीचा आधार घेताना दिसले. उष्णतेमुळे थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी आणि आईस्क्रीमच्या विक्रीत वाढ झाली आहे.यंदा मान्सूनच्या आगमनानंतरही सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे वातावरणातील उष्णता टिकून आहे.
जूनमध्ये साधारणपणे तापमानात घट होण्याची अपेक्षा असते. मात्र यंदा पारा ३९ अंशांच्या आसपास कायम राहिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी १५ जून रोजी मात्र पावसाने हुलकावणी दिली.