

सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी (दि. २८) दुपारी आर्द्रा नक्षत्राचा मुसळधार पाऊस झाला. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने बळीराजामध्ये उत्साह संचारला असून, अजून पाऊस पडला तर खरिपाच्या पेरणीला गती येणार आहे. दरम्यान, या पावसाने सोलापुरात रस्ते ओसंडून वाहत होते. सखल भागात पाणी साचले. काही घरांत पावसाचे पाणीही घुसले. अनेक घरांत लहान मुलांपासून सर्वजण पावसाचे पाणी घरातून बाहेर काढत होते.
गेल्या काही दिवसांपासून कमालीचा उकाडा वाढला होता. घामाच्या धारा आणि तीव्र उष्णतेमुळे त्रस्त झालेले शहरवासीय गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. अखेर रविवारी दुपारी झालेल्या या दमदार पावसाने सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने पाणी घरात घुसले होते.
शहरात रविवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता. नागरिक उन्हाच्या झळांमुळे हैराण झाले होते. अशाताच दुपारी तीनच्या सुमारास अचानक हवामानात वेगाने बदल झाला. आकाशात सर्व बाजूंनी काळेकुट्ट ढग दाटून आले आणि दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारण ४ वाजेपर्यंत शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. ४५ मिनिटांत १७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील सर्वच भागांत पाऊस झाला. पावसाचा वेग इतका जास्त होता की, अवघ्या काही मिनिटांतच शहरातील मुख्य चौक, सखल भाग आणि रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. पावसाचा जोर आणि ढगांचा गडगडाट सुरू होताच महावितरणकडून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. या पावसामुळे शहरातील कमाल तापमानात घट झाली असून, सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे.
या तालुक्यांत पावसाची हजेरी
सोलापूर जिल्ह्यातही अनेक तालुक्यांत शनिवारपासून हजेरी लावली. रविवारी दक्षिण सोलापूर, माढा, पंढरपूर येथे दमदार पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये दीड तास मुसळधार पाऊस झाला. या तालुक्यातील गोगावमध्ये झालेल्या जोरदार पावसाने गावात जाणारा मार्ग काही काळ बंद झाला होता. पाणी ओसरताच पुन्हा तो मार्ग सुरू झाला. गोगावसह खैराट, भुरीकवठा, वागदरी आदी गावांसह मोहोळ तालुक्यातील कामती (बु.), घोडेश्वर (बेगमपूर), जामगाव, कोरवली परिसरात चांगला पाऊस पडला. माढा, पंढरपूर, बार्शी तालुक्यांतही समाधानकारक पाऊस पडल्याने खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.