

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उजनी धरणासह मध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारेसह जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी पाणी नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यात येत्या ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले.
भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. नद्या, नाले कोरडे पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील विविध धरणे व जलाशयांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा धरणनिहाय व वापरनिहाय आढावा घेण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजनामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, त्यानंतर पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि त्यानंतर उपलब्धतेनुसार इतर पाणीवापराचे नियोजन करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला.
या बैठकीस पुणेचे पाटबंधारे मुख्य अभियंता प्रवीण कोल्हे, भीमा कालवा मंडळ अधीक्षक अभियंता धीरज साळे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर अधीक्षक अभियंता सुवेंद्र खांडेकर, कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग रावसाहेब मोरे, टेंभू उपसा सिंचनचे कार्यकारी अभियंता राजन डवरी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
पिण्यासह पशुचाऱ्यास प्राधान्य
भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि चारा यांची उपलब्धता सुरक्षित राहावी, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.