Solapur Water Crisis : मांगीचे पाणी जानेवारीत तर पिंपळगावचा साठा डिसेंबरमध्ये संपणार

जिल्ह्यातील पाणी पातळी घटल्याने लघू व मध्यम प्रकल्प होताहेत कोरडे
Solapur Water Crisis
Solapur Water Crisis
Published on: 
Updated on: 

सोलापूर : उजनी धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्पांमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक असल्याने संबंधित गावांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान निर्माण होणार आहे.

अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची माहिती दिली. ४ नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार, एकरुख प्रकल्पात ०.५५ टीएमसी पाणीसाठा असून, त्यावर सोलापूर शहर, गोदुताई परुळेकर सहकारी संस्था आणि १४ ग्रामपंचायती अवलंबून आहेत. हा साठा ३० जून २०२७ पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. हिंगणी (पा.) प्रकल्पात ०.४४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वैराग शहरासह नऊ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबून असून, हा साठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरण्याचा अंदाज आहे. जवळगाव प्रकल्पातील ०.३६ टीएमसी पाण्यावर नऊ ग्रामपंचायती अवलंबून असून, तेथील साठाही ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल.

मांगी प्रकल्पातील पाणीसाठा मात्र तुलनेने कमी आहे. येथे ०.०९ टीएमसी पाणी उपलब्ध असून, १३ ग्रामपंचायती या पाण्यावर अवलंबून आहेत. हा साठा ३१ जानेवारी २०२७ पर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्याच्या पर्यायी नियोजनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आष्टी प्रकल्पात ०.४८ टीएमसी पाणी उपलब्ध असून, माढा शहरासह सहा ग्रामपंचायती या योजनेवर अवलंबून आहेत. या योजनेसाठी उजनीच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. बोरी प्रकल्पातील ०.१७ टीएमसी पाण्यावर अक्कलकोट शहरासह सात ग्रामपंचायती अवलंबून असून, हा साठा २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पुरण्याचा अंदाज आहे.

पिंपळगाव (दा.) प्रकल्पातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. या प्रकल्पात केवळ ०.०२ टीएमसी पाणी उपलब्ध असून, सात ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा त्यावर अवलंबून आहे. हा साठा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतच पुरणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.