

सोलापूर ः सोलापूर शहरामध्ये भर उन्हाळ्यात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी (दि. 9) दुपारी भवानी पेठ परिसरातील अनेक नगरांमध्ये दूषित, गढूळ, गटारयुक्त पाणीपुरवठा झाला.
शहरातील जनता पाण्यामुळे त्रस्त झाली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात पाण्याची मोठी समस्या आहे. या भागात सात ते आठ दिवसांत पाणीपुरवठा होतो. तोही अशुद्ध. पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी महावितरणने शटडाऊन घेतल्यामुळे महापालिकेच्या पंपग्रहांना करण्यात येणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम शहरातील पाणी उपशावर झाला. ज्या भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार होता, त्या भवानी पेठ, कुंभार गल्ली, बुरुड गल्लीसह संपूर्ण भवानी पेठ परिसरात तब्बल एक तासभर घाण, अशुद्ध, गटारयुक्त पाणीपुरवठा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. पाण्याला पुरेसा दाब नाही. नागरिकांकडे आठवडाभर पाणी साठवणूक करण्याची क्षमता नाही. जादा पाणी साठवल्यास त्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा साथीच्या रोगाची भीती निर्माण झाली आहे.
सोलापुरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलींचा दूषित पाण्याने मृत्यू झाला आहे. बुधवारीही भवानी पेठ परिसरात दूषित पाणीपुरवठा झाला आहे. बाधित क्षेत्रात पामीपुरवठा व ड्रेनेज लाइन वेगळ्या करण्याचे काम सुरु आहे. अशा परिस्थिती याच्याशी संबंधित असलेले पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे हे मागील दोन दिवसांपासून मुख्यालयात नाहीत. आरोग्य विभाग बाधित क्षेत्रात काम करताना पाणीपुरवठा अधिकारी मात्र मुख्यालयाबाहेर आहेत.
बाधित क्षेत्रातील दूषित पाण्याचे 19 नमुने घेतले होते. त्यापैकी 11 नमुने अश्विनी हॉस्पिटल, सात नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेत तापसले. महापालिका प्रयोगशाळेत तपासलेले नमुने दूषित आढळले. 11 नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्याचे मत आरोग्य विभागाचे आहे. पण, पाणीपुरवठा विभाग आपल्याकडे अहवाल आलाच नसल्याचे सांगतो. यावरुन आरोग्य व पाणीपुरवठा विभागात ताळमेळ नसल्याचे दिसते. मयत मुलींचा व्हिसेरा पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. त्या दोघींचा डेंग्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
भवानी पेठ परिसरात पाण्याचा दिवस होता. सुरुवातीला तासभर गढूळ, घाण पाणी आले. नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र महापालिकेचे अधिकारी दखल घेत नाहीत. गढूळ आणि घाण पाण्यामुळे प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनंत जाधव, माजी नगरसेवक
तेथील पाणीपुरवठा लाईन कालबाह्य झाल्या आहेत. नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून 78 लाखांचा प्रस्ताव नियोजन समितीकडे दिला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. नवीन ड्रेनेज लाइनही मंजूर आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल.
संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.