

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सातमधील राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यातील वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. समाजकारणाच्या आडून कटकारस्थान रचले जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अमोल शिंदे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले आहे की, आ. कोठे यांनी आतापर्यंत मराठा व धनगर समाजाचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर केला. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत याच समाजाला संपवण्याचे कटकारस्थान आखले जात आहे. कोठे हे समाजामध्ये फूट पाडून कट्टर राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या पालकमंत्र्यांचा वापर करून दबाव तंत्र राबवले जात असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. सामान्य नागरिकांसाठी रात्रीची वेगळी नियमावली आहे. मात्र आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री पोलिस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत गल्लीबोळात फिरत आहेत. हे नियम सर्वांसाठी समान नाहीत का? असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही बोट ठेवले.
या संपूर्ण प्रकारामागे मला आणि माझ्या समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून बाहेर काढण्याचे षडयंत्र कोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून रचले जात असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला. त्याचबरोबर प्रभाग 15 मधून धनगर समाजाचे उमेदवार चेतन नरोटे यांनाही पाडण्याचा डाव आखण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. समाजकारण विरुद्ध राजकारण असा संघर्ष उघडपणे दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे पुढील पडसाद मतदानावर होण्याची शक्यता आहे.
आपणास अटकेची शक्यता : अमोल शिंदे
मतदान प्रक्रियेच्या दिवश आपणास अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. शहरात अनेक प्रभागात शिवसेना उमेदवार स्ट्राँग ठरत आहेत. त्यामुळे दडपाशी करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे.