

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला नवीन अंगणवाड्या बांधकामासाठी 11 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून 80 अंगणवाड्यांचे बांधकाम होणार आहे. मात्र, ज्या गावात अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे, अशा गावातच या बांधकामास मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध असलेल्या गावात नवीन अंगणवाड्याचे बांधकाम होणार आहे.
महिला बालकल्याण विभागाकडून 80 नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम होणार आहे. तर जवळपास 125 जुन्या अंगवाड्याची दुरुस्तीच्या कामाचे नियोजन सन 2025-26 मध्ये होणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या 11 कोटी रुपयाच्या खर्चासाठी महिला बालकल्याण विभागाकडून नियोजन देखील केले आहे. त्यासाठी नवीन अंगणवाडी बांधकामासाठी 11 लाख 25 हजार रुपये मंजूर होणार आहेत. तर जुन्या अंगणवाडी दुरुस्तीसाठी एक लाख रूपये दिले जाणार आहेत.
गाव पातळीवरून जेवढे प्रस्ताव आले होते. त्यातील जागा उपलब्ध असलेल्या गावातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या गावांत नवीन अंगणवाडीचे बांधकाम होणार आहे. दरम्यान महिला बालकल्याण विभागाकडून नवीन अंगणवाडीचे इमारत बांधकामाचे नियोजन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावात अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच तेथे अंगणवाडीची स्वतंत्र इमारत नसल्याने अंगणवाड्या शाळा, समाजमंदिर, खासगी इमारत आदी ठिकाणी भरवावी लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसत आहे.