Solapur Power Outage: वीज खंडितमुळे ग्रामस्थ त्रस्त

मोडनिंब परिसर; वाढीव ट्रान्सफॉर्मरवर लिंक लाईनची कामे अपूर्ण
 Power Outage
Power OutagePudhari
Published on
Updated on

मोडनिंब : अरण, भेंड, वरवडे, पडसाळी, परिते आणि सोलंकरवाडी या उपकेंद्रांवर ५ एमव्हीए क्षमतेचे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असले तरी संबंधित लिंक लाईनची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांना वारंवार वीजखंडितचा सामना करावा लागत आहे.

अरण, लऊळ, वरवडे, परितेवाडी, तुळशी, व्होळे, उजनी (मा.), जाधववाडी, बैरागवाडी, सोलंकरवाडी तसेच मोडनिंब परिसरातील अनेक वाडी-वस्त्यांमध्ये अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतीपंप बंद पडत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

अरण उपकेंद्रांतर्गत जाधववाडी, बैरागवाडी व तुळशी येथे नवीन लिंक लाईन, सोलंकरवाडी उपकेंद्रांतर्गत मोडनिंब-कुरणखोरा परिसरासाठी नवीन लिंक लाईन, अरणसाठी स्वतंत्र फीडर, पडसाळी व माढा सबस्टेशन विभक्त करण्यासाठी ३३ केव्ही लाईन तसेच उजनी उपकेंद्रासाठी प्रलंबित ३३ केव्ही लिंक लाईनची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

अन्यथा २० जून रोजी रास्ता रोको आंदोलन

मंजूर लिंक लाईनची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत, खंडित व अपुरा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे नेते रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत दि. २० जून रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मोडनिंब (ता. माढा) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

आम्हाला दररोज आठ तास थ्री-फेज वीज मिळणे अपेक्षित आहे; मात्र प्रत्यक्षात तीन-चार तासच वीज मिळते. त्यातही वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीपंप चालत नाहीत. खरीप हंगाम सुरू होत असताना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. महावितरणने प्रलंबित लिंक लाईनची कामे तत्काळ पूर्ण करून नियमित वीजपुरवठा द्यावा.
- अतुल काळे, शेतकरी, अरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news